आज ३ डिसेंबर. जागतिक अपंग दिन.
थोडं वेगळ्या आणि स्पष्ट भाषेत सांगायचं तर आमच्यासारख्या हातीपायी धडधाकट असलेल्या लोकांनी शरीराने विकलांग असलेल्या लोकांची उगाच कीव करण्याचा दिवस.
केवळ सुदैवाने काहीही शारीरिक व्यंग नसलेल्या आमच्यासारख्या बहुतेक लोकांच्या मनात शरीराने विकलांग असलेल्या लोकांविषयी एक वेगळीच कणव असते. ह्या माणसांची दैनंदिन कामं कशी होत असतील? ती कामं करीत असताना काय काय समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागत असेल अशा एक ना दोन, अनेक शंकाकुशंका आपल्या मनात; ह्यांना पाहिलं की सतत घोंघावत असतात. ती विकलांग व्यक्ती कायम परावलंबी, दु:खीच असणार असे कल्पनेचे मनोरे आपण लगेच बांधून मोकळे होतो. अर्थात त्या भावनेमागे त्या विकलांग व्यक्तीपेक्षा मी कसा किंवा कशी धडधाकट आहे हा अहंभाव थोडासा का होईना पण कुठेतरी डोकावत असतोच.
आणि
म्हणूनच एखादी अशीच विकलांग व्यक्ती पूर्णपणे स्वावलंबी असल्याचं आपण
जेव्हा बघतो तेव्हा केवळ अचंबित होऊन जातो. विकलांग व्यक्ती ही केवळ
स्वावलंबीच नाही तर आयुष्यात सुखी, आनंदी असू शकते ही कल्पना काही केल्या
आपल्या मनाला पटत नाही. आणि ह्या सर्वाचं अगदी मूर्तिमंत उदाहरण म्हणजे
आनंदवनातील आमची शकुंतला.
कधीही भेटली तरी अगदी हसतमुखाने स्वागत करणारी ही मुलगी, पोलिओमुळे हाताने काहीच काम करू शकत नाही. विचार करा… सकाळी उठल्यापासूनची सर्वच्या सर्व कामं ही मुलगी पायाच्या सहाय्याने करते. आणि हे कमी म्हणूनच कि काय तर पायाने सुईमध्ये दोरा ओवून त्या दोऱ्याच्या सहाय्याने उत्तम ग्रीटींग कार्ड्स बनवते. विकत घेतलेली ग्रीटींग कार्ड्स, तिला थोडीशी मदत होईल ह्या उद्देशाने मी पाकीटात भरू जाता स्वत:च पायाने ग्रीटींग कार्ड्स पाकीटात भरते. पायानेच पैसे घेते, आणि पायानेच सुट्टे पैसे अगदी मोजून परत देते. वर मी केलेल्या तिच्या थट्टामस्करीला तेवढ्याच चतुरपणे उत्तरही देते.
जी गोष्ट शकुंतलाची तीच गोविंदाची. ह्या गोविंदाच्या हाताला बोटं नाहीयेत; पण त्या बोटं नसलेल्या हातात अशी काही जगावेगळी जादू आहे की ह्या गोविंदाचं काष्ठशिल्पाचं एक प्रदर्शनच उभं राहिलं आहे.
आणि मग प्रश्न उरतो की ह्या विकलांगांची कीव करण्याएवढे आपण खरंच एवढे परिपूर्ण आहोत का? मला अगदी व्यवस्थित सर्व अवयव असूनही मी त्याचा असा काय सदुपयोग करतो आहे? किंबहुना आनंदवनात शकुंतलाला भेटून आलो की माझ्या धडधाकटपणाचीच मला लाज वाटू लागते.