Tuesday, 2 December 2014

आज ३ डिसेंबर. जागतिक अपंग दिन.

थोडं वेगळ्या आणि स्पष्ट भाषेत सांगायचं तर आमच्यासारख्या हातीपायी धडधाकट असलेल्या लोकांनी शरीराने विकलांग असलेल्या लोकांची उगाच कीव करण्याचा दिवस.

केवळ सुदैवाने काहीही शारीरिक व्यंग नसलेल्या आमच्यासारख्या बहुतेक लोकांच्या मनात शरीराने विकलांग असलेल्या लोकांविषयी एक वेगळीच कणव असते. ह्या माणसांची दैनंदिन कामं कशी होत असतील? ती कामं करीत असताना काय काय समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागत असेल अशा एक ना दोन, अनेक शंकाकुशंका आपल्या मनात; ह्यांना पाहिलं की सतत घोंघावत असतात. ती विकलांग व्यक्ती कायम परावलंबी, दु:खीच असणार असे कल्पनेचे मनोरे आपण लगेच बांधून मोकळे होतो. अर्थात त्या भावनेमागे त्या विकलांग व्यक्तीपेक्षा मी कसा किंवा कशी धडधाकट आहे हा अहंभाव थोडासा का होईना पण कुठेतरी डोकावत असतोच.

आणि म्हणूनच एखादी अशीच विकलांग व्यक्ती पूर्णपणे स्वावलंबी असल्याचं आपण जेव्हा बघतो तेव्हा केवळ अचंबित होऊन जातो. विकलांग व्यक्ती ही केवळ स्वावलंबीच नाही तर आयुष्यात सुखी, आनंदी असू शकते ही कल्पना काही केल्या आपल्या मनाला पटत नाही. आणि ह्या सर्वाचं अगदी मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आनंदवनातील आमची शकुंतला.

कधीही भेटली तरी अगदी हसतमुखाने स्वागत करणारी ही मुलगी, पोलिओमुळे हाताने काहीच काम करू शकत नाही. विचार करा… सकाळी उठल्यापासूनची सर्वच्या सर्व कामं ही मुलगी पायाच्या सहाय्याने करते. आणि हे कमी म्हणूनच कि काय तर पायाने सुईमध्ये दोरा ओवून त्या दोऱ्याच्या सहाय्याने उत्तम ग्रीटींग कार्ड्स बनवते. विकत घेतलेली ग्रीटींग कार्ड्स, तिला थोडीशी मदत होईल ह्या उद्देशाने मी पाकीटात भरू जाता स्वत:च पायाने ग्रीटींग कार्ड्स पाकीटात भरते. पायानेच पैसे घेते, आणि पायानेच सुट्टे पैसे अगदी मोजून परत देते. वर मी केलेल्या तिच्या थट्टामस्करीला तेवढ्याच चतुरपणे उत्तरही देते.

जी गोष्ट शकुंतलाची  तीच गोविंदाची. ह्या गोविंदाच्या हाताला बोटं नाहीयेत; पण त्या बोटं नसलेल्या हातात अशी काही जगावेगळी जादू आहे की ह्या गोविंदाचं काष्ठशिल्पाचं एक प्रदर्शनच उभं राहिलं आहे.

आणि मग प्रश्न उरतो की ह्या विकलांगांची कीव करण्याएवढे आपण खरंच एवढे परिपूर्ण आहोत का? मला अगदी व्यवस्थित सर्व अवयव असूनही मी त्याचा असा काय सदुपयोग करतो आहे? किंबहुना आनंदवनात शकुंतलाला भेटून आलो की माझ्या धडधाकटपणाचीच मला लाज वाटू लागते.

Thursday, 9 October 2014

डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रियल हिरो चित्रपटाच्या निमित्ताने -

गेली काही वर्ष आमच्या "उन्नयन" ह्या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने आनंदवन - हेमलकसा हे प्रकल्प अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यानिमित्ताने आता अगदी आमटे परिवारच नाही तर प्रकल्पावरील इतर कार्यकर्त्यांशीही एक वेगळंच भावनिक नातं जुळलं आहे. आणि कदाचित त्यामुळेच ह्या सर्वच प्रकल्पांसाठी सतत काही ना काही करीत राहण्याची एक अनामिक हुरहूर कायमचीच मनात असते.
आज आमच्या प्रकाश भाऊंच्या कार्यावर चित्रपट प्रदर्शित होतोय. मी काही फार आवडीने चित्रपट बघणाऱ्यातला नाही. पण हा चित्रपट सर्वस्वी वेगळा असणार आहे. चित्रपटाचा आशयही निराळा आणि तो पडद्यावर साकारणारे कलाकारही त्याच जबरदस्त ताकदीचे. अर्थात प्रकाश भाऊंचं काम एवढं प्रचंड आहे कि ते केवळ तीन तासाच्या चित्रपटाच्या चौकटीत बसवणं तसं कठीणच. पण कोणत्याही माध्यमातून का असेना, ते काम
जगापुढे येणं अधिक महत्वाचं.
त्यामुळेच ह्या चित्रपटाशी दूरान्वयेही संबंध नसताना अगदी आपल्या घरचाच चित्रपट प्रदर्शित व्हावा अशी ओढ लागली आहे. अगदी चित्रपटाची मित्रमंडळींमध्ये भरपूर प्रसिद्धीही करून झाली आहे. आता तिकीट बारीवरही तो उत्तम चालवा हीच सदीच्छा!
प्रकाश भाऊंच्या कामाविषयी हळूहळू समाजात जागृती होते आहेच. ह्या चित्रपटाच्या निमित्ताने ते काम अधिक तीव्रतेने लोकांपर्यंत पोहोचेल ही अपेक्षा आहे.
चित्रपटाला शुभेच्छा तर आहेतच !!!











Saturday, 9 August 2014

ज्याची त्याची राष्ट्रभक्ती


अजून एक स्वातंत्र्यदिन जवळ येतोय. राष्ट्रभक्तीचे वारे सगळीकडे जोरात  वाहू लागले आहेत. कुणी व्हॉट्स अप वर देशाचा तिरंगा झेंडा ठेऊ लागले आहेत, कुणाच्या मोबाईलच्या कॉलर ट्यून्स बदलू लागल्या आहेत. कुणी अजून काही वेगळ्या प्रकारे… प्रत्येकजण येनकेनप्रकारेण आपल्या देशप्रेमाचे प्रदर्शन मांडू लागलाय.

पण दुर्दैवाने ह्यातल्या बहुतेकांचे राष्ट्रप्रेम हे केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी पुरतंच मर्यादित रहात असतं. एकदा हे दोन दिवस सरले की कुठला देश आणि कुठलं काय? पुन्हा मग "It happens only in India" सारखे देशाचं ओंगळ चित्र उभे करणारे मेसेजेस आणि फोटो फॉरवर्ड करायला हे मोकळे.

खरंच फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला झेंडा वंदन केलं, दोन चार देशभक्तीची गाणी लावली, आणि अजून काही देशभक्तीपर थातूरमातूर केलं की आपली जबाबदारी संपते का? देशभक्ती अशी periodical असू शकते का?

देशसेवा काय फक्त हातात बंदूक धरून सीमेवर लढाई करूनच करता येते? रस्त्यावर कचरा - अगदी कागदाचा कपटाही न टाकणे, माझा परिसर (पर्यायाने माझा देश) स्वच्छ ठेवणे ही एक प्रकारे देशसेवाच नव्हे काय? माझ्या देशाची नैसर्गिक साधनसंपत्ती, वीज, पाणी जपून वापरणे म्हणजे राष्ट्रभक्ती नव्हे काय? आज सोशल मिडिया सर्व जगभरातून सहजपणे वापरला जातो ह्याचे तारतम्य बाळगून, माझ्या देशाविषयी समोरच्या व्यक्तीच्या मनात चांगलीच प्रतिमा तयार होईल ह्याची काळजी घेऊन फेसबुक आणि तत्सम साधने वापरणे हे राष्ट्रप्रेम नाही का?


१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला जोरजोरात देशभक्तिपर गाणी लावायची आणि ह्या दिवसांव्यतिरिक्त कुठे राष्ट्रगीत जरी सुरु असेल तरी दोन मिनिटं उभं न राहता त्याकडे चक्क दुर्लक्ष करून पुढे चालू लागायचं ह्यात कुठली देशभक्ती आहे? देशभक्तीच्या व्याख्येचे साचे थोडे बदलायची वेळ आता आली आहे.

ह्या देशाची पूर्वापार चालत आलेली संस्कृती उच्च प्रतीची होतीच. केवळ त्या संस्कृतीचा अभिमान मनात झिरपणं आवश्यक आहे. अन्यथा असे कैक १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी "साजरे" केले तरी परिस्थिती पालटणं कठीण आहे.



- वैभव प्रभुदेसाई
०९९६७५३४३९६

Saturday, 26 July 2014

आषाढ अमावस्या उर्फ दीप अमावस्या अर्थात गटारी


तृशार्त धरतीला चिंब भिजवून आषाढ संपतो आणि हिरवागार प्रसन्न श्रावण सुरु होतो. "तमसो मा ज्योतिर्गमय" असा संदेश घेऊन येणारी ही आषाढातली अखेरची अमावास्या. हीच अमावस्या दीप अमावस्या किंवा दिव्यांची अवस म्हणूनही ओळखली जाते. घरातल्या सर्व दिव्यांची ह्यादिवशी पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी पासून सुरु होणाऱ्या श्रावण महिन्याची तयारी म्हणून या दिवशी घरातील दीप - निरांजन - कलश इत्यादी पूजेचे साहित्य धूऊन, घासून पुसून लख्ख करून ठेवणे हा त्यामागचा मुख्य उद्देश. या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे पक्वान्न म्हणून खातात. अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात.

ह्या दिवसांत सगळी सृष्टी अगदी हिरवीगार झालेली असते. समुद्रावर जाण्यासाठी कोळी बांधव नारळी पुनवेची वाट पाहत असतात. पावसाळ्याचा हा सुरुवातीचा काळ म्हणजे माशांचा प्रजोत्पादन काळ. माशांची सशक्त पैदास होण्याकरता तसेच निसर्गाचा पूर्णपणे आस्वाद घेण्याकरता जणू काही सृष्टीने मानवाला दिलेला एक छोटासा ब्रेकच असतो. वर्षभर न दिसणाऱ्या  रानभाज्या ह्याच सुमारास बाजारात येतात. विविध रानवनस्पती निरनिराळे रसस्वाद देतात.  त्यांचा पोषकपणा शरीरास मिळणे जरुरीचे असते. याच महिन्यात आपले बरेचसे सणही येतात. पावसाळ्याची सुरुवात म्हणजे रोगराईला आमंत्रणच.  ह्या दिवसांत मांसाहार पचायला जड जातो. आणि म्हणूनच श्रावणात मांसाहार वर्ज्य मानला जातो.

पण आजकाल ही परंपरागत दीप अमावस्या मागे पडून ह्याच दीप अमावास्येला गटारी साजरी (???) करण्याची हिडीस प्रथा रूढ झाली आहे. ह्या दिवशी भरपूर मांसाहार करायचा, यथेच्च दारू प्यायची आणि जमल्यास जिथे मिळेल त्या गटारात लोळण घ्यायची ही सर्वसाधारण हा उत्सव साजरा करण्याची अभिनव पद्धत. 

सतत काही ना काही पचवत असलेल्या पोटाच्या पचनेंद्रीयांना थोडा आराम मिळावा म्हणून सर्वच धर्मात उपवास करण्याची पद्धत आहे. पण मुस्लिम त्यांच्या रोजाचं किंवा ख्रिश्चन धर्मीय त्यांच्या उपवासाचं एवढं प्रदर्शन करताना कधी दिसत नाहीत. मग आपणच का?
 
आजच्या विज्ञान युगात सांडपाणी वाहून नेणारी गटारे स्वच्छ ठेवली, त्यात घाण तुंबू नये अशी व्यवस्था केली तर रोगराई आपोआप वाहून जाईल आणि प्रसन्न श्रावण महिन्याचे आगमन होईल. ‘गटारी'ची आठवण ठेवायची ती त्यासाठी.  


आता ही अमावस्या कशी साजरी करायची हे प्रत्येकाने ठरवायचं आहे, परंपरागत " दिव्यांची पूजा " करुन की अभिनव पद्धतीने " गटारात लोळण " घेऊन. 




- वैभव प्रभुदेसाई
०९९६७५३४३९६