ज्याची त्याची राष्ट्रभक्ती
अजून एक स्वातंत्र्यदिन जवळ येतोय. राष्ट्रभक्तीचे वारे सगळीकडे जोरात वाहू लागले आहेत. कुणी व्हॉट्स अप वर देशाचा तिरंगा झेंडा ठेऊ लागले आहेत, कुणाच्या मोबाईलच्या कॉलर ट्यून्स बदलू लागल्या आहेत. कुणी अजून काही वेगळ्या प्रकारे… प्रत्येकजण येनकेनप्रकारेण आपल्या देशप्रेमाचे प्रदर्शन मांडू लागलाय.
पण दुर्दैवाने
ह्यातल्या बहुतेकांचे राष्ट्रप्रेम हे केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी
पुरतंच मर्यादित रहात असतं. एकदा हे दोन दिवस सरले की कुठला देश आणि कुठलं
काय? पुन्हा मग "It happens only in India" सारखे देशाचं ओंगळ चित्र उभे
करणारे मेसेजेस आणि फोटो फॉरवर्ड करायला हे मोकळे.
खरंच
फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला झेंडा वंदन केलं, दोन चार देशभक्तीची
गाणी लावली, आणि अजून काही देशभक्तीपर थातूरमातूर केलं की आपली जबाबदारी
संपते का? देशभक्ती अशी periodical असू शकते का?
देशसेवा
काय फक्त हातात बंदूक धरून सीमेवर लढाई करूनच करता येते? रस्त्यावर कचरा -
अगदी कागदाचा कपटाही न टाकणे, माझा परिसर (पर्यायाने माझा देश) स्वच्छ
ठेवणे ही एक प्रकारे देशसेवाच नव्हे काय? माझ्या देशाची नैसर्गिक
साधनसंपत्ती, वीज, पाणी जपून वापरणे म्हणजे राष्ट्रभक्ती नव्हे काय? आज
सोशल मिडिया सर्व जगभरातून सहजपणे वापरला जातो ह्याचे तारतम्य बाळगून,
माझ्या देशाविषयी समोरच्या व्यक्तीच्या मनात चांगलीच प्रतिमा तयार होईल
ह्याची काळजी घेऊन फेसबुक आणि तत्सम साधने वापरणे हे राष्ट्रप्रेम नाही
का?
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला जोरजोरात देशभक्तिपर गाणी लावायची आणि ह्या दिवसांव्यतिरिक्त कुठे राष्ट्रगीत जरी सुरु असेल तरी दोन मिनिटं उभं न राहता त्याकडे चक्क दुर्लक्ष करून पुढे चालू लागायचं ह्यात कुठली देशभक्ती आहे? देशभक्तीच्या व्याख्येचे साचे थोडे बदलायची वेळ आता आली आहे.
ह्या देशाची पूर्वापार चालत आलेली संस्कृती उच्च प्रतीची होतीच. केवळ त्या संस्कृतीचा अभिमान मनात झिरपणं आवश्यक आहे. अन्यथा असे कैक १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी "साजरे" केले तरी परिस्थिती पालटणं कठीण आहे.
- वैभव प्रभुदेसाई
०९९६७५३४३९६
very true mitra
ReplyDelete